माणसाची अन्न, वस्त्र, निवाऱ्या इतकीच परिपूर्ण शिक्षण ही सर्वांगीण विकासासाठी सर्वार्थाने महत्वाची अशी मूलभूत गरज आहे. योग्य शिक्षण आणि संस्कारातून मनुष्याला अतिशय सर्वोच्च अशी जगण्याची सर्वांगीण गुणवत्ता अनुभवता येऊ शकते. तसेच चुकीच्या अथवा कमकूवत शिक्षण आणि चुकीच्या संस्कारांमुळे त्याचं मौल्यवान जीवन वायाही जाऊ शकते.
या दृष्टीने विचार करता मानवी व्यक्तिमत्वाचा सर्वार्थाने सर्वांगीण विकास घडवीणारं त्याला फक्त आर्थिक दृष्टया सक्षम नाही तर व्यक्ती म्हणून समृद्ध, सुसंस्कृत आणि संपन्न घडविणे समाज स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.म्हणूनच सध्याच्या प्रचलित भारतीय शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडविणे अत्यंत गरजेचं आहे. त्या करता शिक्षण संस्थांनी, पालकांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी एका दिशेने सहकार्यातून प्रामाणिक प्रयत्न करणे ही तितकेच गरजेचे आहे.
इथे एक गोष्ट समजावून घेतली पाहिजे की संपूर्ण संतुलीत व्यक्तिमत्व विकासासाठी मातृभाषेतून शिक्षण मुलत: आवश्यक आहे.कारण भाषा ही संस्कृतीची वाहिनी आहे. त्या मुळे सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची खरी पाया भरणी ही मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणातूनच होते हे आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केले आहे. तसेच संस्कार हे भाषे इतकेच अनुकरणातून घडतात त्या मुळे विद्यार्थ्यांवर नैतिक जीवनमुल्यांच्या खोलवर संस्कारासाठी शिक्षाकांना आदर्श ‘आचार्य’ घडविणेही महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या निसर्गत: अंगभूत, उपजत गुणांचा शास्रोक्त पद्धतीने शोध घेऊन त्या गुणांचे संवर्धन, विकास आणि व्यावसायिक गुणवत्तेत रूपांतर होण्यासाठी सक्षम व संवेदनशील शिक्षण व्यवस्था निर्माण होणं गरजेचे आहे.
शिक्षणातून व्यवहारिक कौशल्य, विकास आणि त्यातून विकसित होणारी व्यवहार कुशालता आणि आर्थिक स्वावलंबन हे जसे महत्वाचे आहेच.. पण त्याच बरोबर माणूस, समाज आणि निसर्ग यातील संबंध आणि त्याप्रती माणूस म्हणून असलेली व्यक्तीची प्रतिबद्धता व जवाबदारी दृगोचर होण्यासाठी
आपली संस्कृती , त्यातील विज्ञान आणि समृद्ध परंपरा याची आधुनिक परिभाषेत आजच्या पिढीला ओळख आणि आवड निर्माण होणही तितकच आवश्यक आहे.
मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास गरजेचा आहे. आयुष्याला समर्थपणे सामोरं जाण्यासाठी शाररिक, भावनिक, सामाजिक आणि अध्यात्मिक बुद्धिमत्तेचा व क्षमतांचाही विकास तितकाच महत्वाचा आहे. आयुष्य सर्वाथाने संतुलित जगण्याकरिता व्यक्ती सापेक्ष यशाची परिपूर्ण व्याख्या ठरविण्यासाठी आणि ते यश प्राप्त होण्याकरिता आवश्यक गुणवत्ता, कौशल्य आणि सकारात्मक वृत्ती विकासासाठी उपयुक्त असे पोषक वातावरण निर्माण करणं हे मुख्यत: पुढील शिक्षण व्यवस्थेची मूलभूत जवाबदारी आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण संतुलित वापर, पालकांना आदर्श पालकत्वासाठी दिशा दर्शन आणि आवश्यक पडल्यास तज्ञ व्यक्तीकडून योग्य वेळी दिलेले शिक्षण अथवा समुपदेशनही तितकेच महत्वाचं आहे.
बदल हा जगण्याचा स्थायी भाव आहे पण या बदलाची गतीही आधुनिक जगात सध्या खूपच वाढली आहे… या बदला बरोबर स्वतःला जुळवून घेणेही अत्यंत आवश्यक आहे… त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वमध्ये कालसुसंगत सकारात्मक आवश्यक बदल घडविण्याची क्षमता विकसित करणंही आजची आवश्यकता बनली आहे.
तसेच नैतिक मुल्यावर दृढनिष्ठा, प्रत्यक्षकृती आणि श्रमसंस्कार, अविचल देशप्रेम आणि आईवडील आणि समाजाचं देणं देण्यासाठीचा अंगभूत कृतज्ञताभाव सुद्धा शिक्षाणाने जागृत होणं व टिकणं महत्वाचे आहे.
अशा प्रकारे शिक्षण ही फक्त आधीच्या आयुष्यात मार्क्स आणि नंतरच्या आयुष्यात पैसे मिळवाणारे यंत्रवत माणूस निर्माण करणारी व्यवस्था नसून… मनुष्य जीवनाला सर्वार्थाने आचार संपन्न,आशय संपन्न, समृद्ध आणि जगण्याचा संतुलित आस्वाद घेण्यासाठी सक्षम बनवणारी व्यवस्था असणं समज हिताचे आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शिक्षाणाने समाजातील सर्वच स्थरातील व्यक्ती विवेकी, संवेदनशील, नैतिक , स्वयंपूर्ण घडणे सर्वात महत्वाच आहे हे समाजातील सर्वच सुजाण घटकांनी मुळा पासून समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या क्षमता, पात्रता आणि गुणवत्ते नुसार हा बदल घडविण्यासाठी आवर्जून पुढाकार घेतला पाहिजे असे मला मनोमन वाटते..
असे घडले तरच येणाऱ्या आव्हानात्मक काळाला आपण समंजस, उत्तम आणि आश्वासक उत्तर शोधू शकतो आणि आपल्या माणुसपणाचे खऱ्या अर्थाने सार्थक होवू शकते. खरं ना?
श्री विवेक केसकर
M -7666184677
vivek.Keskar@ gmail.com